पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा
पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा ।
डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥
वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें ।
पाटीलबुवाला मग लावून सवें ।
चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥"
किर्र ऽऽ …रात्रींच्या वेगवेगळ्या प्रहरांवर गत पिढ्यांनी अनेक निशाचरांची नावे कोरली आहेत. त्यापैकी, सूर्य उदयाला येण्याअगोदर काही वेळाचा जो प्रहर असतो त्या वेळेचे पूर्वजांनी ‘पिंगळ वेळ’ असे नामकरण करून ठेवले आहे.
या नावातही एक अनोखी गूढता दडलीये. ‘पिंगळ’ म्हणजे घुबड पक्षी अन् ‘पिंगळ वेळ’ म्हणजे त्याच्या ‘किजबिजण्याची वेळ… ’
नेमक्या याच प्रहराचे औचित्य साधत गावकुसाबाहेरील मसणवटीच्या परीघातून गावाच्या दिशेने दोन पावलं हळूहळू सरकू लागतात. भल्या पहाटेच्या नीरव शांततेतील निर्मनुष्य वाटांवर त्या पावलांना केवळ चामड्याच्या कुरकुरणाऱ्या चपलांच्या आवाजाची साथ असते. पहाटेच्या वेळी सावलीसारख्या दिसणाऱ्या त्या धिप्पाड सावळ्या देहाच्या कमरेवर शुभ्रसे एकटांगी धोतर, अंगातल्या आपऱ्या बंडीवर चढविलेले काळेभोर रूबाबदार जॅकेट, बगलेत टांगलेली झोळी, हाताच्या पंज्यात कौशल्याने पकडलेलं कुडमुडं किंवा गुडगुडी अन् पांढरपेशा भाषेत सांगायचं झालं तर छोटसं डमरू असतं. दुसऱ्या हातात मंद तेवणारा स्वच्छ कंदील अन् भव्य कपाळावर आडवे ओढलेले भस्माचे पट्टे, या आडव्या पट्ट्यांचाबरोब्बर मधोमध छेद घेणारं धारधार उभं लालभडक कुंकू अन् रूंद कपाळीच्या फेट्याभोवती करकचून बांधलेला देवतांच्या धातूच्या मुखवट्याचा पट्टा म्हणजे ‘चांद’ अन् या पांगुळाच्या रूपड्याला पिंगळेपण बहाल करणारी त्याच्या ओठांवर रूळणारी शकुन-अपशकुनाची भाषा …!
पांगुळ आला वं माय …शकुन ऐक वं माय !!! ’
असं म्हणतात की पिंगळा घुबडांची भाषा जाणतो अन् पहाटच्या नेमक्या त्याच प्रहरातं तो कंदिलाची वाट पेटवून त्यांच्या गप्पा ऐकत गावाची वेस ओलांडून माणसांची नशीबं पालटतो? कुणी म्हणतं त्याला कर्णपिशाच्च अवगत असतं, तो समोरच्या माणसाचा भूतकाळ त्याच्या कानात पुटपुटतं ?
एकदा या पिंगळ्याचा मागोवा घेत घेत काही मुले मसनवटीच्या दिशेने चालु लागले. या पोरांनी त्याला प्रश्नांचा भडिमार केला, तुला खरंच भविष्य समजत का ?
तो बिचारा पोटासाठी हे सर्व करीत असतो, तो काय यांचे दगड भविष्य सांगणार …! शेवटी त्याच्या तोंडातुन काही शब्द बाहेर पडतात, आणि त्यातूनच खरी उकल होते की पिंगळा म्हणजे नेमका कोण आहे…!
तो म्हणाला,
‘लेकरांनो, भुतं-खेतं अन् भूत भविष्य ह्यो समदा माणसाच्या मनाचा खेळ हायं. आम्ही कुणाचं बी नशीब घडवत न्हाय. आम्ही फकस्त शकून सांगतो. चिंतेत गुरफटलेल्या माणसाला आशा दावतो. अडल्या नडल्याला आशा दावणं हे काय पाप हाय व्हयं? फकस्त माणसांमधीच विषमता पेरून माणूस स्वस्थ बसला न्हाई! तेनं गावकुसापासनं तुटलेल्या मणसवटीला वंगाळ ठरविलं…तेनं दाट जंगलातल्या चपट्या नाकाच्या घुबडाला बी वंगाळ ठरविलं..पर त्येंनीच आम्हाला थारा धिला तवा त्येच आमचं गावकुसं अन् त्येच आमचं सगंसोयरं’
आपसातल्या सांकेतिक भाषेत ते एकमेकांशी बोलतात. त्यांच्या या भाषेला ‘पारोशी’ म्हणतात. भरल्या तोंडाने ‘लेकरांनो , तुमचं भलं व्हईल’ असा आशीर्वाद देऊन तो पाठमोरा झाला.
पिंगळ्याच्या अस्तित्वाला चक्क संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराजांच्या रचनेतील दाखले आहेत. महाराष्ट्राच्या समाजरचनेने जपलेले हे पात्र हळूहळू दिसेनासे झाले आहे. माणसाच्या चेहऱ्यावरील भाव टिपून कोंदटलेल्या मनाला हळूहळू बोलतं करणारा, अन् तर्कावर त्याच्या भवितव्याचे आडाखे बांधून आशावादाचा दिवा तेवविणारा पिंगळारूपी मानवी मनाचा वैद्य या रचनेतून आता वजा होतो आहे.
तिसऱ्या दिवशी गाव बदलून पुढल्या गावाला शकून सांगणारा पिंगळा आता शांत होऊ पाहतो आहे. पिढ्यान् पिढ्या या पिंगळ्यानं महाराष्ट्रातली गावं पालथी घातली. जगण्याचा आशावाद दाखवून इथल्या समाज मनाचं औदासिन्य घालविण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या रूबाबदार फेट्यावरचा चांद भिंतीवरच्या खुंटीवर स्थिरावू पाहतो आहे. त्याच्या पावलातल्या चामड्याच्या चपलांचा कर्रकर्राटही थंडावला आहे, त्याचं कुडमुडं आता थरथरत्या हातानं लय धरू शकत नाही. त्याच्या हातातल्या कंदीलाने आता काजळी पकडली आहे…..!
Comments
Post a Comment