*देवी सीताची जन्मकथा*
पौराणिक कथानुसार सीतेच्या जन्माची एक कथा अशी आहे की, वेदवती नावाची एक भगवान विष्णुची परमभक्त होती. भगवान विष्णुवर तिचे प्रेम जोडल्याने, त्यांची पत्नी होण्याची दृढ ईच्छा तिने मनात बाळगली. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तिने एका अरण्यात घनघोर तपस्या सुरु केली.
एक दिवस रावण असाच जंगलात फेरफटका मारण्यासाठी निघाला. त्याचे लक्ष तपस्या करीत असलेल्या सुंदर आणि लावण्यवती वेदवती कडे केंद्रित झाले. तिचे सौंदर्य पाहून रावण तिच्यावर मोहित झाला. त्याने तिला तु माझी पत्नी असे सांगितले.
वेदवतीने भगवान विष्णुला मनाने केव्हाच पती म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे तिने रावणाला स्पष्ट नकार दिला.
वेदवतीने नकार दिल्याने रावणाला तो भयंकर अपमान वाटला. त्याच्या पराक्रमाचा अंहकार आणि लंकापती असुन नकार दिल्याने त्याचा तिळपापड झाला. शेवटी जबरदस्तीने रावणाने तिचा हात धरला. रावण अतिप्रसंग करीत आहे, हे तिच्या लक्षात आले . तिने रावणाला तु माझ्या मार्गात येऊ नको असे सांगितले. याचा रावणावर तिळमात्र परिणाम झाला नाही.
शेवटी वेदवती रागाने एखाद्या निखाऱ्या सारखी लालबुंद झाली, व ती रावणाला म्हणाली, "मी पुढील जन्मी तुझी मुलगी म्हणून जन्म घेईल आणि तुझ्या मृत्यूचे कारण बनेल !
एवढे बोलणं लालबुंद झालेली वेदवती क्षणार्धात भासम झाली !.
कालांतराने मंदोदरी गर्भवती होते ! रावणाला खुप आनंद होतो. नंतर मंदोदरी बाळंत होते आणि तिला कन्यारत्न झाल्याची बातमी रावणाला समजते.!
त्याचवेळेस आकाशवाणी होते . ही पुत्री तुझ्या मरणाचा कारण बनेल. रावणाला लगेच वेदवतीच्या शापाची आठवण होते !.
रावण त्या कन्येला, आपल्या दास्याकडून, मंदोदरीच्या इच्छेविरुद्ध दूर जाऊन समुद्रात फेकुन देतो. वरूण देवतेला समजते की ही कन्या साक्षात लक्ष्मी आहे. त्यामुळे समुद्र देवता पृथ्वीमातेला विनंती करते की, या कन्येला आपल्या कवेत सामावून घ्या ! त्यानुसार पृथ्वी माता तिला आपल्या उदरात सामावून घेते. ती पृथ्वी माता म्हणजेच मिथिला नगरीतील एक शेत असते!.
कालांतराने राजा सीरध्वज जनक एकदा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या समृद्धी साठी पर्जन्ययज्ञ करतो. त्या यज्ञाची सांगता म्हणून राजाला स्वतः नांगर चालवावा लागतो.
एक आश्चर्यकारक घटना घडते आणि राजाला शेत नांगरताना एक पेटी सापडते. त्या पेटीत एक कन्या असते. सीरध्वज जनक याने तिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. ती शेतात सापडल्याने तिचे नाव सीता असे ठेवले !.
पुर्व तपस्येनुसार उपवर झाल्यावर हिचा विवाह स्वयंवरपद्धतीने इक्ष्वाकु कुळातील, सुर्यवंशी राजपुत्र प्रभू रामचंद्र यांच्याशी झाला.
Comments
Post a Comment