मुंगी उडाली आकाशी
संत मुक्ताबाईंचा हा एक कुट अभंग आहे, त्यामुळे याचे निरूपण करणे तसे अवघड आहे. या अभंगातून त्या जे कधीच शक्य नाही ते पण शक्य होते, असा सांगायचा प्रयत्न तर करीत नाही ना …!, असा प्रश्न मनात उभा राहतो. मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या किती तरी पलीकडे, मनुष्याच्या आभासी ज्ञानाच्या पलीकडे त्यांची अलभ्य विचार शक्ती आहे, हेच यातुन समजते.
"मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी
थोर नवलाव झाला
वांझे पुत्र प्रसवला
विंचू पाताळासी जाय
शेष माथा वंदी पाय
माशी व्याली घार झाली
देखोनी मुक्ताई हासली...
संत मुक्ताबाईचा या अभंगातून जे असंभवनीय ते संभवनीय झाले. अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे, हे गुढ सांगत आहे.
अशा आश्चर्य चकित करणाऱ्या घटना घडल्यामुळे त्यांना स्वतःला हसू येत आहे. 'देखोनी मुक्ताई हासली’ अशक्य कोटीतलं घडलंय जे विनोदी आहे, ते पाहून त्यांना हसू येतंय.या रचनेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतील.
"ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, अगा जे घडलेची नाही, तयाची वार्ता पुससी काई मिथ्या" - अस्तित्वात नसलेल्या मायेने (मुंगीने), सूर्याला (ब्रह्म जाणिवेला/ ज्ञानाला ) गिळून टाकले असं सांगायचं तर मुक्ताई प्रयत्न करीत नाही ना …
"थोर नवलाव झाला
वांझे पुत्र झाला",
अहो एक नवल घडलं, एक आशा संपली होती, तेथे एक नवलाची गोष्ट घडली आहे. एक अज्ञानी गृहस्थ होता, त्याला ज्ञानाचा कसलाही गंध नव्हता. तो एखाद्या दगडासारखा म्हणजे त्याच्या कडुन कसलीही अपेक्षा नव्हती. पण त्याला ज्ञानाचा स्पर्श झाला, आणि तो वाचस्पती बनला. असे तर मुक्ताई सांगत नाही ना…
"विंचू पाताळासी जाय
शेष माथा वंदी पाय"
विंचू पाताळात गेला शेष नागाचा माथा त्याच्या पायाला नमस्कार करतो.
माशी व्याली घार झाली
देखोनी मुक्ताई हासली...
माशी व्याली तिला घार झाली.
संत मुक्ताई मनुष्याला सांगत तर नाही ना … की मनुष्य हा भ्रामक, क्षुद्र, अकल्पित, आभासी, अशाश्वत अशा मायाव्याप्त गोष्टीवर इतका विश्वास ठेवतो, की त्याला आत्मज्ञान न झाल्याने, त्याचे पुर्ण जीवनच भ्रामक गोष्टींनी संपूर्णपणे व्यापले आहे. हे पाहून त्यांना गंमत वाटते. असा अर्थ असू शकेल का…!
दुसरा अर्थ, एकदम याच्या उलट असू शकतो. मी सर्वव्यापक आहे. अहं ब्रह्मास्मि ही जाणीव. ही जाणीव होणे... मुंगी म्हणजे जीवात्मा आणि सूर्य म्हणजे परमात्मा, परब्रह्म.
मुंगीने सूर्याला गिळणे म्हणजे जीवात्म्याच्या जाणिवेचे क्षितिज विस्तारले आहे. आत्मप्रेरणेच्या जोरावर मुंगीरूपी जीवात्म्याने ज्ञानरूपी आकाशात उड्डाण केले आणि स्वयंप्रकाशित चैतन्याला आत्मसात केले. जीवात्म्याचे अज्ञानपटल नाहीसे झाले. त्याची दृष्टी दिव्य व व्यापक बनली. त्याला आत्मस्वरूपाची ओळख पटली आणि सूर्याला गवसणी घातली.
एकदा सत्याचा बोध झाला की, सगळे सोपे वाटते. मायेमुळे किंवा अज्ञानामुळे जे अवघड वाटत होते, ते ज्ञान प्राप्त झाल्यावर सोपे वाटू लागते आणि मग आपल्यालाच आपले हसू येऊ लागते...या अभंगाचा अर्थ असाच असु शकेल…. हे पण एक कुटच आहे.
Comments
Post a Comment